मुंबई17 : रात्री सव्वानऊची वेळ... डोक्यावर पत्र्याच्या भल्या मोठ्या ट्रंका व ताडपत्री गुंडाळलेला सामान घेऊन दिवाळसणासाठी घराकडे निघालेले सीआरपीएफचे 10 जवान दादर रेल्वेस्थानकात गाडी सुटता सुटता धावतपळत दाखल झाले आणि सुरू झाला भावनांचा खेळ... घडाळ्याच्या काट्याला बांधलेल्या नोकरदार मुंबईकरांची पावले घरच्या ओढीने गर्दीत स्वतःला लोटून देतात; पण ज्या जवानांना महिनोंमहिने आपल्या घराचे दर्शन घेतले नाही त्यांना लागलेली घराकडची ओढ आणि गाडी चुकली तर या विचाराने त्यांच्या जीवाची होणारी घालमेल पाहून क्षणभर गर्दीचे श्वासही रोखले गेले.
देशभर मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या दिवाळीचे प्रत्येकाच्या मनातील स्थान काही औरच असते. नोकरी, व्यवसायानिमित्त घरापासून दूर असणारे लोक दिवाळीसाठी आवर्जून गावाकडे कुटुंबात जातात. मुंबईच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांना मोठ्या कष्टाने सुट्टी मिळाली. ते लुधियाना जम्मू एक्स्प्रेसने दिवाळीसाठी आपापल्या गावी निघाले होते.
दादर रेल्वेस्थानकात पोहोचण्यासाठी त्यांना वेळ झाला. सीआरपीएफचे जवान आणि गाडी एकाच वेळी स्थानकात दाखल झाली. सीएसटीकडूनच गाडी प्रवाशांनी खचाखच भरून आली होती. अशात दादरमध्येही प्रवाशांची तोबा गर्दी उसळली होती. एकमेकाला पुढे-मागे रेटत चढणाऱ्या प्रवाशांतून काळ्या ट्रंका आणि ताडपत्री बांधलेले सामान सावरत गाडी पकडणे त्यांना शक्य होत नव्हते. नियोजित वेळ संपताच गाडी सुरू झाली. त्यामुळे गाडी चुकली तर या विचाराने त्यांच्या जीवात कालवाकालव झाली. घरी वाटेकडे डोळे लावून बसलेल्या कुटुंबीयांच्या आठवणीने त्यांचा जीव व्याकुळ झाला आणि सीआरपीएफच्या जाड्या, करड्या वर्दीमागील त्यांचे मन काहीसे हळवे झाले. गाडी चुकली तर सारेच मुसळ केरात हे ओळखून मग त्यांनी व्यूहरचना सुरू केली. प्रवाशांना बाजूला करीत मग दोघे जण सामान न घेताच आत शिरले. काही जणांनी दुसऱ्या डब्याकडे धाव घेतली. तेथून गाडीत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गाडीची साखळी ओढून ती थांबवली. बाहेर थांबलेल्या जवानांकडून सामान आत घेतले. यात दोन-तीन मिनिटे गेली. पुन्हा गाडी सुरू झाली व तिने वेग पकडला; मात्र सामान गाडीत गेल्याने जवानांनी धावत्या गाडीतच उड्या मारल्या. यातील एका जवानाचा हात सुटला. तो खाली पडणार एवढ्यात प्रसंगावधान राखून त्याने दारातील लोखंडी रॉड पकडला. त्यामुळे तो बचावला. अखेर वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गाडीच्या दारात लटकतच जवान रवाना झाले. तेव्हा गर्दीतल्या अनेकांनी समाधानाने सुस्कारा सोडला.
...........................
Monday, 23 November 2009
Subscribe to:
Posts (Atom)