Wednesday 23 December 2009

"स्कूल बस'ची नियमावली महिनाभरात लागू

ंमुंबई, ता.17 : स्कूल बसमधून होणारी असुरक्षित व बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी परिवहन विभागाने तयार केलेल्या प्रस्तावित नियमावलीला येत्या महिनाभरात अंतिम स्वरूप देण्यात येईल. या कालावधीत असुरक्षित वाहतूक करणाऱ्यांची व त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे परिवहन आयुक्त दीपक कपूर यांनी "सकाळ'शी बोलताना दिला.

स्कूल बसमधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असुरक्षित व बेकायदा वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने स्कूल बससाठी काटेकोर नियमावली तयार केली आहे. यामुळे स्कूल बस म्हणून कालबाह्य झालेल्या गाड्या वापरणारे स्कूल बसचालक, असुरक्षित वाहतूक आणि त्याकडे कानाडोळा करणाऱ्या शाळांना चाप बसणार आहे. गेल्या काही महिन्यांत स्कूल बसला झालेल्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुढाकार घेऊन नवी नियमावली तयार केली आहे. मुंबई, पुणे येथे पालक शाळा, स्कूल बसचे मालक, चालक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या नियमावलीबाबत सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या.
येत्या 21 डिसेंबरला नागपूर येथे शेवटची बैठक होणार आहे. त्यानंतर स्कूल बसबाबतच्या नियमावलीला अंतिम स्वरूप देऊन तिची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे कपूर यांनी सांगितले.
दरम्यान स्कूल बसमधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकडे परिवहन विभागाची करडी नजर आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. अपघात झाल्यास जबाबदार
असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Monday 23 November 2009

सुटणारी गाडी आणि घराकडची ओढ...

मुंबई17 : रात्री सव्वानऊची वेळ... डोक्‍यावर पत्र्याच्या भल्या मोठ्या ट्रंका व ताडपत्री गुंडाळलेला सामान घेऊन दिवाळसणासाठी घराकडे निघालेले सीआरपीएफचे 10 जवान दादर रेल्वेस्थानकात गाडी सुटता सुटता धावतपळत दाखल झाले आणि सुरू झाला भावनांचा खेळ... घडाळ्याच्या काट्याला बांधलेल्या नोकरदार मुंबईकरांची पावले घरच्या ओढीने गर्दीत स्वतःला लोटून देतात; पण ज्या जवानांना महिनोंमहिने आपल्या घराचे दर्शन घेतले नाही त्यांना लागलेली घराकडची ओढ आणि गाडी चुकली तर या विचाराने त्यांच्या जीवाची होणारी घालमेल पाहून क्षणभर गर्दीचे श्‍वासही रोखले गेले.
देशभर मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या दिवाळीचे प्रत्येकाच्या मनातील स्थान काही औरच असते. नोकरी, व्यवसायानिमित्त घरापासून दूर असणारे लोक दिवाळीसाठी आवर्जून गावाकडे कुटुंबात जातात. मुंबईच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांना मोठ्या कष्टाने सुट्टी मिळाली. ते लुधियाना जम्मू एक्‍स्प्रेसने दिवाळीसाठी आपापल्या गावी निघाले होते.
दादर रेल्वेस्थानकात पोहोचण्यासाठी त्यांना वेळ झाला. सीआरपीएफचे जवान आणि गाडी एकाच वेळी स्थानकात दाखल झाली. सीएसटीकडूनच गाडी प्रवाशांनी खचाखच भरून आली होती. अशात दादरमध्येही प्रवाशांची तोबा गर्दी उसळली होती. एकमेकाला पुढे-मागे रेटत चढणाऱ्या प्रवाशांतून काळ्या ट्रंका आणि ताडपत्री बांधलेले सामान सावरत गाडी पकडणे त्यांना शक्‍य होत नव्हते. नियोजित वेळ संपताच गाडी सुरू झाली. त्यामुळे गाडी चुकली तर या विचाराने त्यांच्या जीवात कालवाकालव झाली. घरी वाटेकडे डोळे लावून बसलेल्या कुटुंबीयांच्या आठवणीने त्यांचा जीव व्याकुळ झाला आणि सीआरपीएफच्या जाड्या, करड्या वर्दीमागील त्यांचे मन काहीसे हळवे झाले. गाडी चुकली तर सारेच मुसळ केरात हे ओळखून मग त्यांनी व्यूहरचना सुरू केली. प्रवाशांना बाजूला करीत मग दोघे जण सामान न घेताच आत शिरले. काही जणांनी दुसऱ्या डब्याकडे धाव घेतली. तेथून गाडीत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गाडीची साखळी ओढून ती थांबवली. बाहेर थांबलेल्या जवानांकडून सामान आत घेतले. यात दोन-तीन मिनिटे गेली. पुन्हा गाडी सुरू झाली व तिने वेग पकडला; मात्र सामान गाडीत गेल्याने जवानांनी धावत्या गाडीतच उड्या मारल्या. यातील एका जवानाचा हात सुटला. तो खाली पडणार एवढ्यात प्रसंगावधान राखून त्याने दारातील लोखंडी रॉड पकडला. त्यामुळे तो बचावला. अखेर वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गाडीच्या दारात लटकतच जवान रवाना झाले. तेव्हा गर्दीतल्या अनेकांनी समाधानाने सुस्कारा सोडला.
...........................